महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमाला बोईसरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ, प्रभावी आणि सुसंवादी व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाला मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी उपस्थिती लावली.एमआयडीसी नाका येथील सी.टी.ई.एस. इंग्रजी माध्यम शाळेत झालेल्या उद्घाटन समारंभात मराठी भाषेच्या व्यवहारातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद, बोईसर-तारापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. संजय घरत होते. त्यांनी मराठी भाषेचा प्रसार आणि प्रवाशांशी प्रभावी संवादासाठी स्थानिक भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.कोमसापचे प्रतिनिधी राजाराम पवार यांनी प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील स्थानिक भाषेतील संवादामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे सांगितले. परिवहन अधिकारी हेमंत कोळेकर यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रिक्षाचालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक चालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांना मराठीतील दैनंदिन संवाद, प्रवाशांशी नम्र व प्रभावी संभाषण तसेच स्थानिक भाषेचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी ३२ रिक्षाचालकांनी सहभाग नोंदविला. कोमसापच्या सचिव डॉ. स्मिता माळवदे यांनी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवून संवाद अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
