पालघरमध्ये लोकस्वातंत्र पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

पालघर : मराठी पत्रकारितेचे पितामह व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पालघर जिल्ह्यात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महासंघाचे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी जगदीश करोतिया यांच्या सिडको कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर त्यांच्या जीवनकार्याचा व मराठी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाचा आढावा उपस्थित पत्रकारांना देण्यात आला.
यावेळी टीमा मार्ग चेअरमन रवी भावसार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जनतेचे प्रश्न जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच उद्योगपती व कारखानदारांचेही प्रश्न महत्त्वाचे आहेत. पत्रकारांनी दोन्ही बाजू समतोलपणे समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे हे पत्रकारांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात लोकमतचे वरिष्ठ पत्रकार व कोकण विभाग प्रमुख पंकज राऊत यांनी पत्रकारितेतील बदलांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या पत्रकारितेत मर्यादित साधनसामग्री असूनही बातमीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत असे, तर आज तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, आजही घटनेमागील कारणे, जबाबदार व्यक्ती आणि सत्याधारित मांडणी तितकीच महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
“पत्रकारिता टिकाऊ असावी, विकाऊ नसावी,” असे ठामपणे सांगत त्यांनी निःपक्षपाती पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी जगदीश करोतिया यांनी पत्रकारितेतील सत्य-असत्याच्या दोन बाजूंवर भाष्य करत पत्रकाराने नेहमी सत्याचीच बाजू मांडावी असे सांगितले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास संतोष घरत, विजय बोपार्डीकर, रियाज मुल्ला, संपत उजाला, सुशांत संखे, स्वप्निल पिंपळे, देवेंद्र मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुशांत संखे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top