बोईसर : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मराठी माझी संवाद भाषा’ अभियानास बोईसरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिक्षाचालक आणि वाहन मालकांना मराठी भाषेत प्रभावी संवाद साधता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ गुरुवारी (१९ जून) करण्यात आला.
एमआयडीसी नाका परिसरातील सी.टी.ई.एस. इंग्रजी माध्यम शाळेत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात मराठी भाषेचे सामाजिक आणि व्यावहारिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद, बोईसर-तारापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. संजय घरत यांनी मराठी भाषेतील संवाद कौशल्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात अधिक सुसंवाद निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगितले.
जिल्हा प्रतिनिधी सुहास राऊत यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेचे प्रतिनिधी राजाराम पवार यांनी स्थानिक भाषेतील संवादामुळे प्रवाशांशी अधिक आत्मीयता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक परिवहन अधिकारी हेमचंद्र कोळेकर यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती देत अधिकाधिक रिक्षाचालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मोठ्या संख्येने चालकांनी प्रशिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रितेश भोणे, परितोष ठाकूर, अखिलेश सिंह, संदीप घरत, उल्लास पाध्ये, अंजना सावे, मुख्याध्यापिका रोहिणी नाईक, दीपक रावरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी ३३ रिक्षाचालकांनी सहभाग नोंदविला.
कोमसापचे सचिव डॉ. संदीप स्मिता माळवदे यांनी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले. स्थानिक स्तरावर मराठी संवाद अधिक सक्षम आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











