शिरगावात ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’त ‘राजा रयतेचा’ महानाट्याचा विनामूल्य विशेष प्रयोग

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला नागरिकांसाठी खुला प्रवेश

पालघर, दि. १८ : पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि इतिहासाचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. महोत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी असलेले “राजा रयतेचा” हे भव्य महानाट्य दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत सादर केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संदर्भित शासन निर्णयाच्या अनुषंगाने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारा “राजा रयतेचा” महानाट्याचा एक विशेष प्रयोग सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला करण्यात आला आहे. इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग, स्वराज्याची संकल्पना आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजांच्या कार्याची प्रभावी मांडणी या नाट्यातून साकारली जाणार आहे.
भव्य नेपथ्य, दिमाखदार वेशभूषा, प्रकाशयोजना आणि जिवंत अभिनयाच्या माध्यमातून साकार होणारे हे महानाट्य प्रेक्षकांना थेट स्वराज्याच्या कालखंडात घेऊन जाणारे ठरणार आहे. कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक पातळीवर गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि लोकपरंपरांचेही दर्शन घडत आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शिवजयंतीच्या औचित्याने इतिहासाच्या स्मरणातून प्रेरणा घेण्याची आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्याची ही अनोखी पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top